Home क्राईम क्रिकेट सामन्यात मधमाशांचा भीषण हल्ला ; पंचचा मैदानातच मृत्यू 

क्रिकेट सामन्यात मधमाशांचा भीषण हल्ला ; पंचचा मैदानातच मृत्यू 


उन्नाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । क्रिकेट विश्वाला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे घडली आहे. स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ६५ वर्षीय अनुभवी पंच मानिक गुप्ता यांचा मैदानातच मृत्यू झाला, तर काही खेळाडू व दुसरे पंच गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे क्रीडा वर्तुळात शोककळा पसरली आहे.

ही दुर्घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सप्रू मैदानावर KDMA अंडर-१३ क्रिकेट लीग सामन्यादरम्यान घडली. YMCC आणि पॅरामाउंट या दोन संघांमध्ये सामना रंगला असताना अचानक मधमाशांचा मोठा थवा मैदानावर घोंगावू लागला. खेळाडूंना काही कळायच्या आतच मधमाशांनी मैदानावरील पंच आणि खेळाडूंवर हल्ला चढवला.

मुख्य पंच मानिक गुप्ता (६५) यांना मधमाशांनी अक्षरशः वेढले. त्यांच्या अंगावरील पांढऱ्या कपड्यांमुळे मधमाशांचा थवा त्यांच्याकडे अधिक आकर्षित झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुमारे दहा मिनिटे मधमाशांनी त्यांच्यावर डंख मारल्याने ते बेशुद्ध पडले. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेत दुसरे पंच जगदीश शर्मा आणि काही तरुण खेळाडू देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कानपूर येथील हॅलेट हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. घटनेनंतर सर्व जखमींना प्रथम शुक्लागंज येथील रुग्णालयात आणि त्यानंतर कानपूरमधील लक्ष्मीपत सिंघानिया इन्स्टिट्यूटमध्ये हलविण्यात आले.

मृत मानिक गुप्ता हे गेल्या ३० वर्षांपासून कानपूर क्रिकेट असोसिएशन (KCA) च्या पंच पॅनेलचे सक्रिय सदस्य होते. क्रिकेट क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून ते शिस्तप्रिय आणि समर्पित पंच म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनामुळे क्रिकेट क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

KCA चे अध्यक्ष संजय कपूर यांनी मानिक गुप्ता यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “मानिक गुप्ता हे खेळासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते. KCA परिवार या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि आयोजकांवर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खुल्या मैदानांमध्ये होणाऱ्या क्रीडा स्पर्धांदरम्यान आपत्कालीन परिस्थितीसाठी योग्य तयारी असणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या दुर्घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.


Protected Content

Play sound