पुणे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरले आहे. बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ एका भरधाव कारने नियंत्रण सुटल्याने सिमेंटच्या खांबाला धडक दिली. या भीषण अपघातात दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये ऋतिक भंडारी आणि यश भंडारी यांचा समावेश असून कुशवंत टेकवणी हा गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात आज (रविवारी, २ नोव्हेंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. प्राथमिक माहितीनुसार, गाडीचा हँड ब्रेक ओढल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती भरधाव वेगाने जाऊन मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या पिलरला धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की काळ्या रंगाच्या एमएच २४ डीटी ८२९२ या कारचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. कार भाड्याने घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या अपघातात ऋतिक भंडारी आणि यश भंडारी हे दोघेही गाडीच्या पुढच्या सीटवर बसले होते. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला कुशवंत टेकवणी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. फुटेजमध्ये गाडी अतिवेगात असल्याचे स्पष्ट दिसून येते. गाडीतील प्रवाशांनी मद्यप्राशन केले होते का किंवा अंमली पदार्थांचा वापर झाला होता का, याची तपासणी फॉरेन्सिक टीमकडून केली जाणार आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोरेगाव पार्क परिसरात रात्री आणि पहाटेच्या सुमारास भरधाव वाहनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक विभागावर नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या भीषण अपघातामुळे दोन तरुणांचे उमलते जीवन अकाली संपुष्टात आले असून त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, हा अपघात नेमका कसा झाला याचा उलगडा होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.



