Home Cities अमळनेर भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत गलवाडे येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर

भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत गलवाडे येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर

0
111

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गलवाडे ते अमळनेर रस्त्यावरील हॉटेल केसरीसमोर बुधवारी दुपारी एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गलवाडे येथील ४५ वर्षीय ईश्वर आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गलवाडे गावावर शोककळा पसरली आहे.

भरधाव ट्रकने घेतला बळी मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर आनंदा पाटील हे बुधवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांचे सहकारी समाधान भिकन पाटील यांच्यासोबत दुचाकीने (MH 19 ED 9559) गलवाडेकडून अमळनेरच्या दिशेने जात होते. यावेळी हॉटेल केसरीसमोर समोरून येणाऱ्या ट्रकने (RJ 14 GJ 9136) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, ईश्वर पाटील यांचा जागीच अंत झाला, तर पाठीमागे बसलेले समाधान पाटील गंभीर जखमी झाले. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हरियाणाच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचे भाऊ विश्वास भगवान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारवड पोलीस ठाण्यात ट्रक चालक रुस्तम जैनु (रा. हरियाणा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे. मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound