पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील कृषी सेवा केंद्रास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ नगरपालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग विझविण्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी कृषी केंद्र चालकाचे सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रामराव पाटील यांनी गेल्या ६ महिन्यापुर्वी धरती धन कृषी सेवा केंद्र या नावाने भाडेतत्त्वावर सुरू केले होते. १८ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळच्या वेळेस ग्राहक नसल्याने रामराव पाटील हे सायंकाळी ५ वाजता कृषी सेवा केंद्र बंद करुन शहरातील गणेश काॅलनी स्थित घरी निघुन गेले. दरम्यान सायंकाळी ७ वाजुन ३० मिनिटांनी धरती धन कृषी सेवा केंद्रातुन आगीचे लोट उसळु लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होवुन आगीवर नियंत्रण करण्यात आले. मात्र या आगीत रामराव पाटील यांचे दुकानात असलेले खते, बि – बियाणे, रासायनिक खते यांचे सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रसंगी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.