बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समृद्धी महामार्गावर कारला आग लागल्याने भीषण अपघात झाला आहे. या आगीत दोन जण होरपळून ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार मुंबईहून अकोल्याकडे जात होती. नागपूर कॉरिडॉरवरील चेनेज 318.8 जवळ कारला अचानक आग लागली आणि मोठा स्फोट झाला. कार अनियंत्रित झाल्याने साईड बॅरिकेटला धडकून तिला मोठी आग लागली. या आगीत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
मृतकांची ओळख:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार क्रमांक (MH-04 LB-3109) मुंबईहून अकोलाकडे जात असताना हा अपघात झाला. यात गणेश टेकाडे आणि राजू जायसवाल (दोघेही रा. मुंबई) यांचा होरपळून मृत्यू झाला. कार चालक अभिजित चव्हाण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.