Home उद्योग यावल एसटी आगारातील चालक-वाहकांचा प्रामाणिकपणा ; प्रवाशाचे एटीएमसह मौल्यवान वस्तू सुरक्षित परत

यावल एसटी आगारातील चालक-वाहकांचा प्रामाणिकपणा ; प्रवाशाचे एटीएमसह मौल्यवान वस्तू सुरक्षित परत


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल एसटी आगारात कार्यरत असलेल्या चालक व वाहकांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक सेवेतील मूल्ये अधोरेखित झाली आहेत. एसटी बसमधून प्रवास करताना हरवलेले पाकीट शोधून ते थेट प्रवाशाच्या स्वाधीन केल्याने या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावल आगारातील चालक रफिक तडवी व वाहक नबाब तडवी हे चोपडा मुक्कामाच्या एसटी बसने नियोजित फेरीत यावल ते पाल असा प्रवास करत असताना बसमधील प्रवासी सरफराज तडवी (रा. तालुका अमळनेर) यांचे पाकीट गाडीत पडले. या पाकिटात रोख रक्कम, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड व अन्य महत्त्वाची कागदपत्रे होती. प्रवासादरम्यान हे पाकीट वाहक नबाब तडवी यांच्या निदर्शनास आले.

पाकीट तपासल्यानंतर त्यामध्ये आधारकार्ड असल्याचे लक्षात येताच त्यावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. चौकशीअंती हे पाकीट अमळनेर येथील सरफराज तडवी यांचे असल्याची खात्री झाली. तत्काळ त्यांना फोन करून पाकीट सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली व नंतर ते संपूर्ण पाकीट त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

चालक रफिक तडवी व वाहक नबाब तडवी यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल प्रवासी वर्गातून तसेच एसटी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा होत आहे. यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी प्रवासी सरफराज तडवी यांच्या वतीने अभिनंदनपर बक्षीस म्हणून एक हजार रुपये देण्यात आले. हा सत्कार यावल आगारात सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमास कार्यशाळा प्रमुख शुक्ला, टी.आय. कुंदन वानखेडे, इंटक संघटनेचे अध्यक्ष नामदार तडवी यांच्यासह कर्मचारी लिपिक महेंद्र पाटील, अतुल चौधरी, वाहन परीक्षक संजय चौधरी, वाय.सी. तडवी, आर.सी. सोनवणे, डी.एम. भोई, हेमंत पाटील, एस.आर. तडवी, राजू बारी, के.व्ही. साळुंखे तसेच इतर रापम कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound