अमळनेरमध्ये चार तालुक्यांचे होमगार्ड तिमाही संमेलन उत्साहात ; समस्या व मागण्यांवर सविस्तर चर्चा

0
148

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे अमळनेर, धरणगाव, पारोळा व चोपडा या चार तालुक्यांतील होमगार्डचे तिमाही संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित या संमेलनात होमगार्डच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून होमगार्ड विभागाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे उपस्थित होते. यासोबतच जिल्हा केंद्र नायक गंगाधर महाजन, जिल्हा पलटण नायक मदन रावते, वरिष्ठ लिपिक पंकज नेरकर, कनिष्ठ लिपिक रितेश पाटील, शिपाई हेमंत माळी, अमळनेर प्रभारी समादेशक अधिकारी गोपाल वना पाटील, पारोळा प्रभारी समादेशक अधिकारी अरुण पाटील, चोपड्याचे साजिद सैय्यद शेख, संजीव सोनवणे, धरणगाव प्रभारी समादेशक अधिकारी ईश्वर महाजन व पलटण नायक ईश्वर पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

होमगार्ड ही मानसेवी संघटना असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस दलास मोलाचे सहकार्य करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या आदेशानुसार होमगार्डना विविध कर्तव्यांवर तैनात करण्यात येते. होमगार्डच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी, समस्या आणि त्यावर उपाययोजना याबाबत महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासमादेशकांच्या परिपत्रकानुसार चारही तालुक्यांचे एकत्रित तिमाही संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनात अमळनेर, पारोळा, चोपडा आणि धरणगाव येथील सर्व होमगार्ड पथकातील होमगार्ड बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ३६५ दिवस कायमस्वरूपी काम मिळावे, तीन वर्षांची पुनर्नियुक्ती पद्धत बंद करावी, विमा सुविधा तसेच टी.ए. आणि डी.ए. देण्यात यावे, तालुका समादेशकांची किमान पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात यावी अशा महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. यासोबतच विशेष कामगिरी केलेल्या होमगार्ड बांधवांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

संमेलनादरम्यान जिल्हा समादेशक अशोक नखाते यांनी उपस्थित होमगार्डच्या सर्व समस्या आणि तक्रारींची सविस्तर नोंद घेण्यात येत असून त्या होमगार्ड महासमादेशक, मुंबई यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे उपस्थित होमगार्डमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

संमेलनाच्या आयोजनासाठी अमळनेर येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी तालुका समादेशक गोपाल वना पाटील यांच्यासह कैलास पाटील, भीमराव संदानशिव आणि विष्णू पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

एकूणच या तिमाही संमेलनातून होमगार्डच्या समस्या शासनदरबारी मांडण्याचा प्रभावी प्रयत्न झाला असून, भविष्यात सकारात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.