धरणगाव (प्रतिनिधी) पोलिसात तक्रार द्या, मग घराला लागलेली आग विझवायला येऊ, अशी मुजोर भूमिका घेतल्यामुळे गावातील एका गरीब शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे लोकनियुक्त नगरध्यक्षांनी पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा संतप्त प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी साधारण साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान शहरातील गुरव गल्लीत राहणारे सोमनाथ निंबा महाजन यांच्या घरातील गॅस सिलेंडर लिकेज झाल्यामुळे अचानक आग लागली. गल्लीत प्रथमेश सूर्यवंशी या तरुणाने तात्काळ पालिका गाठली व सर्व हकीगत अग्नीशमन दलातील कर्मचाऱ्याला सांगितली. परंतू ‘त्या’ पालिका कर्मचाऱ्याने आधी पोलिसात तक्रार द्या, मग घराला लागलेली आग विझवायला येऊ, असे बेजाबदार उत्तर दिले. एकीकडे घराला लागलेली आग वाढत असतांना दुसरीकडे पालिका कर्मचारी दिरंगाई केल्याचा आरोप नागरिकांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ केला. आग वाढल्यामुळे सोमनाथ महाजन यांच्या घरातील रोकड व इतर साहित्य मिळून साधारण चार लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचा बंब वेळेवर पोहचला असता तर आग वेळीच आटोक्यात आली असती आणि नुकसान टळले असते, असेही श्री.महाजन यांचे म्हणणे आहे. आता पालिका प्रशासन आगीत झालेले नुकसान भरून देणार आहे का? असा संतप्त सवाल देखील सुज्ञ नागरिक विचारत आहे. दुसरीकडे नुकताच लोकनियुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले निलेश चौधरी हे या प्रकरणात काय कारवाई करतात? याकडे देखील धरणगावकरांचे लक्ष लागून आहे.