भुसावळ प्रतिनिधी । दिवसेंदिवस विज वितरण कंपनीकडून ग्राहकांना अतिशय जीर्ण व जुन्या साहित्याद्वारे वीज पुरवठा केला जातो त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा पुरवठा होणे, हलक्या वाऱ्याने किंवा पावसाने वीज पुरवठा खंडित होणे, तासनतास वीज बंद राहणे, असे प्रकार नित्याचेच झाले असून याला कंटाळून जागतिक ग्राहक दिनी भुसावळात ग्राहकांतर्फे वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच कामांची चौकशी न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ताळ लावू असा इशारा रामराज्य फॉऊंडेशनचे सचिव प्रा.धिरज पाटील यांनी दिला. प्रसंगी गजराज फॉऊंडेशनचे अध्यक्ष विशाल ठोके, आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक देवेंद्र पाटील, सुरज पाटील, पोपट बोंडे, सुरेश टेमकर, उत्तम पाटील, पिंटू भोई, रमेश खडके, एकनाथ वारके, राजू परदेशी, मनोज सोनवणे उपस्थित होते.
ग्राहकाच्या तक्रारी याप्रमाणे
वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा पुरवठा होणे, हलक्या वाऱ्याने किंवा पावसाने वीज पुरवठा खंडित होणे, तासनतास वीज बंद राहणे, असे प्रकार नित्याचेच झाले आहे. त्यातच भर म्हणजे ज्यांच्यावर वीज कार्यालयाची जबाबदारी सोपविली आहे, तेच या कंपनीचे काही मुख्य व सहाय्यक अभियंते व लाईनमन मुख्यालयी राहत नाही. दिलेले अर्ज गायब होतात. यामुळे नागरिक त्रस्त झाली असून मानसिक व आर्थिक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत होता यासंदर्भात अनेक वेळेस अर्ज, निवेदन चर्चा करूनसुद्धा सहाय्यक अभियंते घोरुडे यांनी समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले होते परंतु कोणतीही समस्या न सोडवल्याने आज १५ मार्च २०१९ रोजी जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशी श्री नगर, मोहित नगर, अयोध्या नगर, भोई नगर, गणेश कॉलनी, स्वामी विहार, खळवाडी, अष्टविनायक कॉलनी व हुडको कॉलनी येथील नागरिकांनी रामराज्य फॉऊंडेशनचे सचिव प्रा.धिरज पाटील यांच्या नेतृत्वात वीज बिलाची होळी केली.
पूर्वसूचना न देताच वीजपुरवठा खंडित
एकीकडे उन्हाचा पारा वाढत चाललेला असून मेंटनन्सच्या नावावर वीज पुरवठा खंडित होते मुळात ही कामे सुरू केली नसल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे तसेच भरपूर भागात एकच ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा केला जात असून पर्यायी ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे नागरिकांना एक एक तास उकाड्याचा सामना करावा लागतो तसेच कोणतीही पूर्वसूचना न देताच वीजपुरवठा खंडित केला जातो हे चुकीचे आहे तसेच मेंटेनन्सच्या कामाची चौकशी न झाल्यास वीज विरतरण कंपनीच्या ऑफिसला ताळे लावू असे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.
वीज नियमांची दिली माहिती
विजेची नवीन जोडणीसाठीचे नियम, विजेची अचूक मोजणी होणे, मीटर बॉक्स बसविणे, मीटरचे वाचन ठरावीक कालांतराने होत नसेल तर त्वरित तक्रार करणे. ग्राहकाला जर विजेचे बिल त्याच्या सरासरी बिलापेक्षा जास्त आले तर ग्राहकाने आपल्या मीटरची अचूकता पडताळणे. फ्युज गेल्यास शहरी भागात चार तासात विद्युत पुरवठा पूर्ववत करणे बंधनकारक आहे. एखाद्या पीडित ग्राहकाला नुकसानभरपाईची मागणी करावयाची असेल तर विद्युत नियामक आयोगाने सांगितलेल्या निवारण पद्धतीनुसारच तक्रार करावी अशी उपस्थितांना या वेळेस वीज बिल तसेच इतर नियमांची माहिती देवेंद्र पाटील यांनी दिली.