पाचोरा प्रतिनिधी । सन २०१७ पासुन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवुन देणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या विरोधात तालुक्याचा आमदार म्हणून वारंवार अधिवेशनात विषय घेतला. आता हा विषय अंतिम टप्प्यात येवुन ठेपला असून लवकरच गुंतवणुक धारकांना परतावा मिळणार आहे. अशी माहिती आ.किशोर पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
तथापि, गेल्या मंगळवारी राज्याचे गृहमंत्री (ग्रामिण) शंभुराजे देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार किशोर पाटील यांचे सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील मैत्रेय कंपनीच्या सुमारे ४४० प्राॅपर्ट्या राज्य सरकारने अटॅच केल्या असुन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूक धारकांना परतावा लवकरात लवकर कसा मिळवुन देता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली असुन महाराष्ट्रातील गुंतवणूक धारक व एजंट यांनी संयम ठेवावा. कोरोना या महामारी मुळे सदरील प्रकरणाच्या पाठपुराव्यास विलंब झाला होता. अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, स्वीय्य सहाय्यक राजु पाटील उपस्थित होते.