चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील चौधरी वाडा जहागीरदारवाडी तसेच घाट रोड कडील नदी पलीकडचा भाग येथे राहणाऱ्या रहिवाशांना अनेक वर्षांपासून त्यांच्या राहत्या घरांच्या जागेबाबत उतारा मिळणे कामी अडचणी येत आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी महसूल विभाग, नगरपरिषद, नगरभुमापन अधिकारी यांच्यासह सोमवारी बैठक बोलवा. असे सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी दिले.
नुकतीच तहसील कार्यालयात खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी तहसिलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्यासह उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सभापती संजय पाटील, सामजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन, मंडळ अधिकारी शैलेश राजपूत, माजी सरपंच रवी आबा राजपूत आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी जनतेची कैफियत मांडत चौधरीवाडा, जहागीरदारवाडी तसेच नदी पलीकडील बाजूला जी घरे जुनी, पारंपारिक व पन्नास वर्षांपूर्वीची असल्याने दाखल्यावर जुनी नावे आहेत मात्र जे आता रहिवाशी आहेत त्यांच्या नावाने दाखला मिळत नाही. गुंठेवारी कायदा रद्द झाला असल्याने दंडात्मक आकारणी करून त्यांची नावे उताऱ्यावर लागणे ही प्रक्रिया बंद झाली आहे.याबाबत अनेक तक्रारी व समस्या उत्पन्न झालेल्या आहेत. याबाबत येथील रहिवाशांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांना व्यक्तिशः भेटून या तक्रारीवर मार्ग काढण्याची विनंती केली असून या सर्व वैधानिक बाबी पूर्ण करून त्यांना त्यांच्या उताऱ्यावर नाव लावण्यासाठी काय उपाययोजना करता येईल. या गोष्टीचा उहापोह होवून त्यावर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद अधिकारी, सिटी सर्व्हे अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक 21 तारीख सोमवार रोजी आपल्या कार्यालयात बोलवावी. संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या संबंधित टिप्पणीसह उपस्थित राहण्याची सूचना करावी. जेणेकरून वरील समस्या मार्गी लागण्यास मदत होईल. अशी सूचना वजा आदेश खासदार उन्मेश पाटील यांनी दिले आहेत.
बैठक बोलवा खासदारांचे पत्र
याबाबत खासदार उन्मेश पाटील यांनी पत्राद्वारे बैठकीची मागणी करुन सर्व अधिकाऱ्यासमक्ष ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी सुचना करीत पत्र दीले आहे. या अनुषंगाने सोमवारी बैठक आयोजित केली असल्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी सांगितले आहे.