औरंगाबाद, वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात हिटलरचा पुनर्जन्म झाला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
मुस्लीम समाजाचे नाव पुढे करून हिंदूंना गाफील ठेवण्याची ही नीती आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुरू असलेली ही मोठी लढाई आहे. आजही आसाममधील १४ लाख हिंदूंकडे कागदपत्रे नाहीत. आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक परिवारांकडे, भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांकडे जुने पुरावे कोठून येणार, असा सवाल आव्हाड यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी यांच्या रूपात हिटलरचा पुनर्जन्म झाला असून लवकरच सोशल मीडियासाठीही कायदा लादला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केले.
तुम्ही कोणासोबत फोटो काढले, कोणासोबत संभाषण केलं हेदेखील त्यांना कळणार आहे. तसंच त्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय असल्याचं ते म्हणाले. देशात दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची वेळ आली आगे आणि आता गोळवलकर विरूद्ध गांधी असा विचार आहे. समाजाला विभक्त करण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व समाजाला एकत्रित येऊन लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.