जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिक्षातून अजिंठा चौफुली पर्यंत सोडून देण्यास नकार दिल्याने, दुचाकीवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी रिक्षात बसलेल्या चालकाच्या गर्भवती पत्नीच्या पोटात लाथ मारली. तसेच रिक्षत्त चालकाला शिवीगाळ करीत त्याला देखील मारहाण केली. ही घटना रविवारी ७ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास बेंडाळे चौकातील झाशीच्या राणी पुतळ्याजवळ घडली. याप्रकरणी रविवारी ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील सलमान अहमद निजाम (वय २३) हा तरुण सद्या फातेमा नगरात वास्तव्यास आहे. सलमान हा शनिवारी ७ जुलै रोजी सायंकाळी पत्नीला घेवून (एमएच १९, सीडबल्यू १६५२) क्रमांकाच्या रिक्षाने त्याच्या आई वडीलांना भेटण्यासाठी गेंदालाल मिल परिसरात गेला होता. सलमानची पत्नी सहा महिन्यांची गर्भवती असल्याने ते जेवण करुन रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी बेंडाळे चौकात तीन दुचाकीस्वारांनी सलमान याची रिक्षा थांबवली. त्यातील एका बुलेट चालकाने आमच्या दोन तीन जणांना अजिंठा चौफुलीपर्यंत सोड असे सांगितले. परंतू सलमान याने रिक्षा माझी पत्नी बसली असून मी घरी जात असल्याचे त्याने सांगितले.
दुचाकीस्वारांनी तु जास्त शहाणा झाला आहे का?, तुझे नाव काय आहे म्हणत बुलेटस्वाराने रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावली. तसेच सोबतच्या सहकाऱ्यांनी रिक्षाचालकाला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. रिक्षा चालकाची पत्नी मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न करीत असतांना, मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारली. मारहाण होत असतांना रिक्षा चालकासह त्याच्या पत्नीने आरडाओरड केल्यामुळे तेथील दोन तीन जण त्यांच्याकडे धावत आले. यावेळी मारहाण करणारे दुचाकीस्वार अजिंठा चौफुलीच्या दिशेने पसार झाले. रिक्षा चालक सलमान याने सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.