जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा गावाजवळ रात्री हिट अँड रनची थरारक घटना घडली असून यात कार चालकासह एकूण चार जण जखमी झाले आहेत.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, एमएच 15 सीडी 8194 या क्रमांकाच्या कारमधून दोन जण म्हसावदमार्गे नेरी येथे येत होते. यातच या कारचालकाने म्हसावद येथे एकाला कट मारला होता. यामुळे कुणी पाठलाग करण्याच्या आधीच त्या कार चालकाने प्रचंड वेगाने आपले वाहन पुढे पळविले.
ही भरधाव कार वावडदा गावाजवळ आली असतांना एका महिलेस या वाहनाने उडविले. येथून ही कार भरधाव वेगाने विटनेरकडे निघाली. दरम्यान, वावडद्याच्या लोकांनी विटनेरकरांना याबाबत आधीच मोबाईलवरून माहिती दिली. यामुळे त्यांनी बैलगाडी रस्त्यावर आडवी करून कारला अडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्या कार चालकाने पुन्हा आपली कार वावडद्याकडे भरधाव वेगाने आणली. वावडदा फाट्याच्या जवळ त्याने पुन्हा एका तरूणाला जोरदार धडक दिली. यानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटून शेतात जाऊन पडली.
या अपघातात एक महिला व एक तरूणासह कारमधील दोन जण जखमी झाले आहेत. या दोघांना जळगावातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल रात्री घडली. अलीकडेच रामदेववाडी येथील हिट अँड रन घटनेत चौघांना प्राण गमवावे लागले होते. यानंतर काल रात्री पुन्हा याच प्रकाराची पुनरावृत्ती होण्याचे थोडक्यात टळले. मात्र महामार्गावरील हिट अँड रनचे वाढते प्रकार हे चिंताजनक बनल्याचे यातून दिसून आले आहे.