Home क्रीडा विजय हजारे ट्रॉफीत ऐतिहासिक थरार! कर्नाटकने 400+ धावांचा पाठलाग पूर्ण करत रचला...

विजय हजारे ट्रॉफीत ऐतिहासिक थरार! कर्नाटकने 400+ धावांचा पाठलाग पूर्ण करत रचला नवा विक्रम


रांची-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये क्रिकेटप्रेमींना थक्क करणारा सामना पाहायला मिळाला. एका बाजूला बिहारने स्पर्धेच्या इतिहासातील धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय नोंदवला, तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक संघाने 400 हून अधिक धावांचे अवाढव्य लक्ष्य गाठून भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. या सामन्यामुळे विजय हजारे ट्रॉफी ही स्पर्धा विक्रमांची खाण ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

कर्णधार इशान किशनच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर झारखंडने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 412 धावांचा डोंगर उभा केला. इशान किशनने 125 धावांचे झंझावाती शतक झळकावत कर्नाटकच्या गोलंदाजांवर दडपण आणले. झारखंडची ही धावसंख्या पाहता सामना जवळपास एकतर्फी वाटत होता, मात्र कर्नाटकच्या फलंदाजांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. डावाची सूत्रे देवदत्त पडिक्कलने आपल्या हातात घेत झारखंडच्या गोलंदाजीची अक्षरशः धुलाई केली. पडिक्कलने 147 धावांची शानदार खेळी साकारत कर्नाटकच्या विजयाचा पाया मजबूत केला. त्याच्या खेळीमुळे मोठ्या धावसंख्येचा दबाव संघावर जाणवू दिला नाही.

पडिक्कलला इतर फलंदाजांनीही भक्कम साथ दिली. अभिनव मनोहरने सहाव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 56 धावा करत डाव सावरला, तर ध्रुव प्रभाकरने 40 धावांचे योगदान देत विजय जवळ आणला. अखेर कर्नाटकने 5 विकेट्स गमावत 47.3 षटकांत 413 धावा करत ऐतिहासिक विजय साकारला.

या विजयासह कर्नाटकने विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम आंध्र प्रदेशकडे होता. 2012 मध्ये आंध्रने गोव्याविरुद्ध 384 धावांचे लक्ष्य 48.4 षटकांत 6 विकेट्स गमावत गाठले होते. तब्बल 13 वर्षांनंतर कर्नाटकने हा विक्रम मोडून नवा मानदंड निर्माण केला आहे.

हा विजय लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासातही विशेष ठरला आहे. 400 हून अधिक धावांचा पाठलाग करणारा कर्नाटक हा जगातील दुसरा संघ ठरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 435 धावांचे लक्ष्य गाठण्याचा जागतिक विक्रम केला होता. त्यानंतर आता कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याआधी 2014 मध्ये क्वीन्सलँडने तस्मानियाविरुद्ध 399 धावांचे लक्ष्य गाठले होते.

विजय हजारे ट्रॉफीतील हा सामना केवळ विजय-पराजयापुरता मर्यादित न राहता, भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजीची वाढती ताकद आणि बदलत जाणारी खेळशैली अधोरेखित करणारा ठरला आहे.


Protected Content

Play sound