हिंदुत्व हाच शिवसेनेचा श्‍वास आणि ध्यास – ना. गुलाबराव पाटील

अकोला प्रतिनिधी । हिंदुत्व हाच शिवसेनाचा श्‍वास आणि ध्यास असून आम्हाला कुणी याबाबत शिकवण्याची गरज नाही….शिवसेनेने केलेली जनहिताची कामे पाहता पोलीस भरती प्रमाणे शिवसैनिकांची भरती होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा अकोल्याचे संपर्क मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आगामी सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांना पाणी पाजणार असल्याची गर्जना केली. ते आज अकोल्यातील मेळाव्यात बोलत होते.

ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी आहे. या अनुषंगाने सकाळी बुलढाणा येथे बैठक झाल्यानंतर त्यांनी दुपारी अकोला येथे पक्षाची बैठक घेतली. याप्रसंगी ना. पाटील यांनी जोरदार भाषण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, हिंदुत्व हा शिवसेनेचा श्‍वास असून याबाबत कुणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. देशाचा विचार केला असता, शिवसेना हा पक्ष इतर काही पक्षांपेक्षा लहान असला तरी आमचे बाप अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्वात मोठे आहेत. आजवर मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्री, खासदार, आमदार फुटले…मात्र सच्चा शिवसैनिक हा कधीही फुटला नाही आणि फुटणारही नाही असे ना. पाटील म्हणाले.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शिवसेना हा प्रखर हिंदुत्वाच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. आम्ही फक्त जनहिताचाच विचार करतो. आणि शिवसेनेचे खर्‍या शिवसैनिकाला न्याय मिळतो. याचमुळे माझ्यासारखा साधा शिवसैनिक हा आज मंत्रीपदावर विराजमान झालेला आहे. मात्र कुणीही पदाचा अभिमान न बाळगता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या समाजकारणाचा मूलमंत्र विसरता कामा नये. याच्याच बळावर आपण ग्रामपंचायतच काय कोणत्याही निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणारच असल्याची गर्जना ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

प्रास्ताविकात जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीनजी देशमुख यांनी ग्राम पंचायत निवडणुकीत विजयी होण्यासाठी पदाधिकारी यांना  विजयाचा मूलमंत्र देऊन 225 ग्रा.पं पैंकी 16 बिनविरोध झाल्या असून त्यापैकी 7 ग्रा पंचायतींवर भगवा फडकल्याचे सांगितले. तसेच सविस्तर पणे  जिल्ह्याचा आढावा दिला.

याप्रसंगी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, जिल्हा प्रमुख आ. नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, बंडू ढोरे, मुकेश मुरूमकार, राजेश मिश्रा ,जिल्ह्यातील तालुका प्रमुख शहर प्रमुख व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्हा बैठकीचे सूत्रसंचालन योगेश गीते यांनी केले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.

 

Protected Content