जळगाव प्रतिनिधी | छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा प्रमुख जलदुर्ग असलेल्या ‘विजयदुर्ग’ या किल्ल्याचं संवर्धन व्हावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती सभा जळगाव यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. छत्रपती शिवरायांनी सागरीमार्गे होणारी आक्रमण मोडून काढण्यासाठी स्वतः आरमार आणि जलदुर्गाची निर्मिती केली. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या जलदुर्गा पैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग म्हणजे विजय दुर्ग मात्र या दुर्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
किल्ल्याची भव्य तटबंदीवर गवत आणि झाडे वाढलेली आहेत. जिबीचा दरवाजा अशी पाटी दिसते मात्र दरवाजा नाही. तिहेरी तटबंदी असलेला हा किल्ला मात्र अनेक ठिकाणी ही तटबंदी कोसळली आहे. महाद्वार किल्ल्याचे भूषण असते मात्र या वास्तूच्या महाद्वारास दरवाजेच नाहीत. वाढलेल्या झुडपामुळे ही तटबंदी धोक्यात आली आहे. देवडी आणि नगारखाना यांची दुरवस्था झाली असून टेहाळणी बुरूजाच्या भिंती दुभंगलेल्या आहेत. येथील शिवमंदिराची स्थितीही खराब झाली आहे. दारूगोळा कोठार धोकादायक स्थितीत असून तटबंदी आणि भिंती यांची विदारक स्थिती आहे. राज दरबाराच्या भव्य वास्तूवर, भिंतीवर गवत आणि झाडे वाढलेली आहे. यामुळे या वास्तूच्या बांधकामाला छेद देऊ लागले आहेत. भवानी देवीच्या मंदिरामध्ये मूर्तीच्या भोवताली भिंतीचे अवशेष पडले आहेत त्यामुळे भवानी मातेची मूर्ती दिसत नाही.
या सर्व बाबी लक्षात घेत पुरातत्व विभागाने या कार्याकडे लक्ष देत किल्ल्याचे जतन आणि संवर्धन होणं आवश्यक आहे.” असं म्हणत, “किल्ले विजयदुर्गची शासकीय अधिकारी, किल्ल्याशी संबंधित व्यक्तींमार्फत पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात यावा. किल्ल्यावर वाढलेली झाडे गवत काढण्यात यावी. संरक्षक भिंत आणि किल्ल्यापासून काही अंतरावर आरमाराची गोदीचं जतन-संवर्धन व्हावं. विजयदुर्गवर झालेल्या संशोधनाला व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. विजयदुर्ग स्थानाच्या इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्यात यावा. जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन यांच्या संकेतस्थळावर किल्ल्याचा इतिहास सचित्र प्रसिद्ध करण्यात यावा. किल्ल्याच्या संबंधित शिवकालीन वस्तूंचे वस्तुसंग्रहालय किल्ल्यावर उभारण्यात यावं. किल्ल्यांच्या वास्तूची, इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत आणि किल्ल्याच्या दुरवस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी” अशा मागण्यांचे निवेदन हिंदू जनजागृती सभा जळगाव यांच्यावतीने मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं.