
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मानेच्या मणक्यावरील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया करून जळगावातील डॉ. उल्हास पाटील रूग्णालय येथील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी ६२ वर्षीय रुग्णाला अक्षरशः नवे आयुष्य दिले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुर्यभान रोडगे यांच्यावर करण्यात आलेल्या या अवघड शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या हात-पायांना पुन्हा हालचाल मिळू लागली असून ते सध्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकत आहेत.

माहितीनुसार, सुर्यभान रोडगे हे कैऱ्या तोडत असताना अचानक झाडावरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि हात-पायांची ताकद पूर्णपणे निघून गेली. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना तातडीने जालना येथून जळगावातील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी सखोल तपासणी केली. एमआरआय व सीटी स्कॅन अहवालात मानेच्या सी-७ मणक्याला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. या फ्रॅक्चरमुळे मज्जासंस्थेवर दबाव निर्माण होऊन हात-पायांची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती.
रुग्णाची अवस्था पाहता तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. डॉ. विपूल राठोड यांनी ‘सी-७ कॉर्पेक्टोमी विथ केज फिक्सेशन’ ही अत्यंत अवघड आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेत फ्रॅक्चर झालेला मणका काढून त्या जागी इम्प्लांट आणि केज बसवून मणक्याला आवश्यक आधार देण्यात आला. शस्त्रक्रिया अत्यंत नाजूक स्वरूपाची असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याची मोठी परीक्षा होती.
विशेष म्हणजे या उपचारासाठी रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत लाभ मिळाला. महागड्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला. त्यामुळे ही योजना गरजूंसाठी वरदान ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. हळूहळू त्यांच्या हात-पायांची ताकद पूर्ववत होऊ लागली असून सध्या ते स्वतः उभे राहण्यास सक्षम झाले आहेत. पुढील फिजिओथेरपी उपचार सुरू असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्ण बरे होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अतुल जाधव, डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, भूलतज्ज्ञ डॉ. शीतल फेगडे, डॉ. मारीया आणि शालीक चौधरी यांनी सहकार्य केले. निवासी डॉक्टर डॉ. प्रितम दास यांनी सांगितले की, मानेच्या मणक्याचे फ्रॅक्चर हे अतिशय संवेदनशील व जीवघेणे असू शकते. वेळेत योग्य निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाचे हात-पाय पुन्हा कार्यरत होऊ शकतात. अशा अपघातानंतर विलंब न करता तज्ज्ञांकडे उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.



