मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीला आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून आरोपीला बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने मुंबई उच्च याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप त्याच्या आत्याने केला होता. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. त्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. अखेर या प्रकरणी निकाल देण्यात आला. या निकालात अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या अपघात घटनेत बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या आई-वडिलांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या आरोपी तरुणाची बालसुधारगृहातून सुटका होणार आहे. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, 22 मे 2024, 5 जून 2024 आणि 12 जून 2024 चे बालहक्क न्यायालयाचे जे आदेश आहेत, त्यामध्ये विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले होते, त्या अवैध आहेत. त्यामुळे ते आदेश रद्द झाले आहेत. त्यामुळे विधीसंघर्षित बालकाला तातडीने सोडावे लागणार आहे, त्याचा ताबा आत्याकडे देण्यात येणार आहे. आता जे आदेश आले आहेत असे वकील म्हणाले.
19 मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणा-या पोर्शेने दोघांना चिरडले होते. त्यानंतर हा अल्पवयीन मुलगा हा बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच ससूनमध्ये आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरबदल केल्यामुळे ससूनचे दोन डॉक्टर आणि आरोपीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली होती. सध्या आरोपीचे वडील, आई आणि आजोबा पोलिस कोठडीत आहेत. त्यामुळे आरोपीला आत्याच्या ताब्यात दिले जाणार आहे.
खरे तर या प्रकरणी आरोपीला घटनेच्या अवघ्या काही तासांनी बाल हक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन असल्याच्या मुद्द्यावरुन जामीन मिळाला होता. केवळ 300 शब्दांच्या निबंध लेखणाच्या शिक्षेच्या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणी पोलिसांवर जोरदार टीका झाल्यानंतर पोलिस, सरकार यांच्यावरील दबाव वाढला होता.नंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. पण अखेर या प्रकरणी आता अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाला आहे.