मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी खासदार हेमंत पाटील यांचे राजकिय पुनर्वसन करण्यासाठी शिंदेसेनेकडून हालचाली सुरु झाल्या होत्या. विधान परिषदेच्या सदस्यपदी त्यांची निवड झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची विधान परिषदेमध्ये शिंदेसेनेच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. या विधान परिषदेच्या गटनेतेपदाच्या आडून त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या हालचाली शिंदेसेनेकडून सुरु झाल्या आहेत. पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.
त्यांच्या राजकिय पुनर्वसनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आग्रही असल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष असलेल्या माजी खासदार हेमंत पाटील यांना हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदासाठी मंत्रीपदाचा दर्जा बहाल करण्यात आला. हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेने उमेदवारी नाकारली होती. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला.