आसामच्या मुख्यमंत्रीपदी हेमंत बिस्वा सरमा यांची वर्णी

गुवाहाटी, वृत्तसंस्था । आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी आज  हेमंत बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. सरमा हे आसामचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेदेखील सहभागी झाले होते.

आसाम विधानसभा निवडणुकीनंतर भाजप विधिमंडळ दलाच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून हेममंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीच या बैठकीत हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर राज्यपालांची भेट घेत सरमा यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

मुख्यमंत्री सरमा यांच्यासोबत आसामचे भाजप प्रमुख रणजितकुमार दास, आसामगढ परिषद (एजीपी) प्रमुख अतुल बोरा, यूपीपीएलचे नेते यूजी ब्रह्मा, भाजप नेते रिमाल शुक्लवैद्य, भाजप नेते चंद्र मोहन यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याअगोदर हेमंत बिस्वा सरमा यांनी गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात, उत्तर गुवाहाटीच्या दौल गोविंद मंदिरात पूजा-अर्चना केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत १३ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. यात भाजपचे १०, एजीपीच्या दोन आणि यूपीपीएलच्या एका आमदाराचा समावेश आहे.

 

Protected Content