कोकणच्या धर्तीवर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत – मुख्यमंत्र्यांचे निर्देश !

मुंबई /जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील चाळीसगावसह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सविस्तर माहिती दिली.  यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिन्ही तालुक्यांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ लाऊन नुकसानीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून यानंतर लागलीच मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली.

अतिवृष्टीमुळे चाळीसगावसह परिसरात प्रचंड हानी झाली आहे. या तिन्ही तालुक्यांमधील १०८ घरांची पूर्णत: तर ६५३ घरांची पूर्णपणे हानी झाली असून ३०६ दुकाने क्षतीग्रस्त झाली आहेत. ४०४ लहान तर ६१४ मोठी गुरे वाहून गेली असून तब्बल १५१९५ हेक्टर क्षेत्रावरील पीक आणि फळ पीकांचे नुकसान झाल्याबाबत त्यांनी मंत्रीमंडळाला अवगत केले. याचा फटका पाचोरा आणि भडगाव तालुक्यालाही बसला असला तरी तो तुलनेत कमी आहे. चाळीसगाव शहरासह तालुक्याला याचा मोठा फटका बसला आहे. या आपत्तीची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ चाळीसगाव तालुक्याला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला होता. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले होते. तर, या प्रकरणी आपण बुधवारी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विषय मांडणार असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

 

या अनुषंगाने आज दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची सविस्तर माहिती दिली. या आपत्तीमुळे चाळीसगाव तालुक्यातील ४२, पाचोर्‍यातील ४ तर भडगावमधील २ असे एकूण ३८ गावे बाधीत झाली आहेत. या गावांमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

 

शेतकरी आधीच अडचणीत असतांना या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो शेतकर्‍यांवर आभाळ कोसळले आहे. यामुळे त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी बळ लाऊन सुरू असलेल्या पंचनाम्यानुसार नुकसानीचे प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून यावरून तात्काळ मदत जाहीर करता येईल असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोकणच्या धर्तीवर ही मदत आपदग्रस्तांना तातडीने प्रदान करण्यात येणार असल्याची ग्वाही सुध्दा मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content