जळगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरु आहे. आज सकाळी तर वाळू माफियांची जणू नदी पात्रात जत्राच भरलेली होती. दिवसाढवळ्या हा सर्व प्रकार सुरु असतांना जिल्हाधिकारी नावाच्या पदावर जळगावात कुणी कार्यरत आहे किंवा नाही? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशीच एकूण गंभीर परिस्थिती आहे.
आज सकाळपासून बांभोरी येथील गिरणा नदीच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु होता. अगदी शासकीय परवानगी असल्यागत अनेक ट्रॅक्टर नदी पत्रातून वाळूची लुट करीत होते. जळगाव जिल्ह्यात कायमच बेकायदेशीर वाळू उपशावरून मोठा वादंग सुरू असते. पावसाळा सुरु झाल्यानंतर देखील गिरणा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरुच आहे. त्यामुळे ठेकेदार कोट्यावधींचा मलिदा अक्षरशः ओरबाडत आहेत. या सर्व प्रकारात अधिकारीही छुपे भागीदार असल्याचा आरोप कायमच होत असतो. त्यामुळेच संबंधित यंत्रणेची साथ लाभत असल्याने तस्करी सुरू असल्याचे बोलले जाते.
वाळू ठेक्यांची मुदत संपल्यानंतरही वाळू उपसा सुरू असल्याचा तक्रारी कायमच महसूल विभागाकडे केल्या जातात. तरीही महसूल किंवा पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळेच ठेकेदार आणि अधिकारी यातून गब्बर झाले आहेत. गिरणा नदीपात्रातून रोज असा वाळूचा उपसा सुरु आहे. एकंदरीत जळगाव पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नदी पात्रात वाळू माफिया उतरायला घाबरत नाही. तर ज्या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालय लांब आहे. त्याठिकाणी काय स्थिती असेल? याचा विचार न केलेला बरा. एकंदरीत भविष्यात हॅलो..हॅलो माईक टेस्टिंग…जिल्हाधिकारी आहेत का? असा प्रश्न जळगावकर आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांनी रस्त्यावर उतरून विचारला तर आश्चर्य वाटायला नको.