मुक्ताईनगर-पंकज कपले | आज झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे तालुक्यातून वाहणार्या गोरक्षगंगा नदीला महापूर आला असून यामुळे कुंड धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे. यामुळे कुर्हा-काकोडा, वढोदा आणि परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली असून प्रशासनाने परिसरात सतर्कतेचा अलर्ट जारी केला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यात काल रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. तर सातपुडा पर्वतरांगांमध्ये जोरदार अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर आलेला आहे. यात गोरक्षगंगा नदीला महापूर आलेला आहे. यामुळे या नदीवर बांधण्यात आलेले कुंड हे धरण आज ओसंडून वाहू लागले आहे. परिणामी खालील बाजूला असलेल्या कुर्हा-काकोडा, वढोदा आणि अन्य गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
दरम्यान, या आपत्तीची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी थेट कुर्हा येथे जाऊन याबाबतची माहिती जाणून घेतली. त्यांच्या सोबत आमदार चंद्रकांत पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके आणि अशोक कांडेलकर यांचीही उपस्थिती होती. तर आमदार एकनाथराव खडसे, रोहिणीताई खडसे यांनी देखील आपल्या सहकार्यांसह पुरस्थितीची पाहणी केली.
कुंड धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे कुर्हा-काकोडा येथील काही भागांमध्ये पाणी शिरले आहे. यात मुख्य बाजारपेठ आणि गावाचा संपर्क तुटला असून पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. रात्री पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असून यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. महसूल आणि पोलीस खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी येथील स्थितीवर नजर ठेवत आहेत.