सातपुड्यात ढगफुटी; भोकर नदीला महापूर ! : रावेर-मुक्ताईनगरचा संपर्क तुटला

रावेर-शालीक महाजन (लाईव्ह ट्रेंडस न्यूज-ग्राऊंड झीरो स्पॉट रिपोर्ट ) | महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वतराजीत ढगफुटी झाल्याने भोकर नदीला महापूर आला असून यामुळे रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

रावेर तालुक्याला सातत्याने अतिवृष्टीचा फटका पडत आहे. यंदा पाच जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातपुड्याच्या माथ्याजवळ ढगफुटीने जोरदार वृष्टी झाली होती. यामुळे सुकी तसेच अन्य नद्यांना पूर येऊन रावेरात मोठा हाहाकार उडाला होता. तेव्हा रावेरसह तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. यात रावेर शहरातून जाणार्‍या नागझिरीचा पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर तालुक्यातील रमजीपूरसह अन्य ठिकाणी देखील संपर्क तुटला होता.

यानंतर दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने कुंभारखेडा तसेच अन्य तालुक्यांचा संपर्क तुटला होता. तर आज अहिरवाडीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. दरम्यान, आज दुपारी सातपुड्यातील माथ्यावर पुन्हा एकदा ढगफुटी झाली. यामुळे सातपुड्यात उगम पावलेल्या भोकर नदीला महापूर आला आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात या नदीला महापूर आल्याने परिसरातील अनेक गावांना धोका निर्माण झालेला आहे.

भोकर नदी ही गरताड गावाच्या मार्गाने रावेर तालुक्यात प्रवेश करते. तर विटवा गावाजवळ ही नदी तापीला जाऊन मिळते. दरम्यान, या नदीवर पातोंडी आणि पुनगाव येथे दोन पूल आहेत. याच पुलांच्या माध्यमातून रावेर आणि मुक्ताईनगरच्या दरम्यानची प्रमुख वाहतूक चालते. भोकरला आलेल्या महापुरामुळे या दोन्ही पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या दोन्ही पुलांवर दोन्ही बाजूंनी पोलीस बंदोबस्त लाऊन बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत. यामुळे दोन्ही तालुक्यांमधील संपर्क तुटलेला आहे.

दरम्यान, भोकरला महापूर आल्यामुळे परिसरातील अनेक शेतांमध्येही पाणी शिरले असून प्रशासन यावर लक्ष ठेवून आले. तहसीलदार बंडू कापसे आणि पोलीस निरिक्षक श्री. नागरे हे आपल्या सहकार्‍यांसह जातीने या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर पोलीस निरिक्षक हे सहकार्‍यांसह पुलाजवळ आहेत.

भोकर नदीला महापूर आल्याची माहिती मिळताच दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली आहे. या लोकांना पोलिसांनी आवर घातला आहे. तर रात्रीतून देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने परिसरातील लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचा अलर्ट जारी केला आहे.

Protected Content