अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांद्री आणि पातोंडा गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे चोपडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, नांद्री गावाचा परिसराशी संपर्क पूर्णतः तुटला आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये चिंता आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात रात्री आणि पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषतः नांद्री गावामध्ये जलमय परिस्थिती निर्माण झाली असून, काही जमीनदोस्त घरांमध्येही पुराचे पाणी घुसल्याची माहिती मिळाली आहे. घरांच्या आत पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांचे संसार उघड्यावर आले असून, अन्न, पाणी आणि सुरक्षिततेसंदर्भात मोठी अडचण निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पूरग्रस्त गावातील लोकांनी आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून, बचावकार्य सुरू करावे, अशीही मागणी केली जात आहे.
नांद्री ते पातोंडा दरम्यान असलेल्या चोपडा रस्त्यावरून वाहणाऱ्या नाल्याला अचानक मोठा पूर आला. यामुळे रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून, वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक प्रवासी रस्त्यावर अडकले आहेत. पूर पाहण्यासाठी काही उत्सुक ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली असून, त्यामुळे देखील गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
या संपूर्ण परिस्थितीने नांद्री आणि पातोंडा या दोन गावांमधील दळणवळण तुटले आहे. पावसाचा जोर असेच कायम राहिल्यास पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाकडून अजूनही कोणतीही ठोस मदत पोहोचलेली नाही, त्यामुळे ग्रामस्थांत अस्वस्थता वाढत चालली आहे.



