Home Cities यावल यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे मोठे नुकसान; पंचनाम्याला सुरूवात

यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे मोठे नुकसान; पंचनाम्याला सुरूवात


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांच्या घरांचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली असून, महसूल प्रशासनाला नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आज सकाळपासूनच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आणि फैजपूर विभागाचे प्रांतधिकारी बबनराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या पथकाने नुकसानीच्या पाहणीला सुरुवात केली आहे. आज डांभुर्णी (तालुका यावल) या गावात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. यावेळी डांभुर्णी गावाच्या सरपंच कल्पनाबाई बावीस्कर यांच्यासह अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे यांनी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल. दरम्यान, तालुक्यातील इतर ठिकाणी देखील वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत असून, त्या नुकसानीचेही पंचनामे व्हावेत, अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिक व्यक्त करत आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदत पुरवली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound