चाळीसगाव प्रतिनिधी | रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी आणि तितूर नदीला पूल आला असून शहरातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे अलीकडेच आलेल्या महापूराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, ३० ऑगस्टच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. यानंतरही पावसाचे प्रमाण वाढतच राहिले आहे. यातच काल रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार वृष्टी झाली. यामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांसह परिसरातील सर्व नाल्यांना मोठा पूर आला आहे. विशेष बाब म्हणजे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना एकाच महिन्यात पाचव्यांदा पूर आलेला आहे. शहराच्या मधून जाणार्या नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे येथील रहदारी बंद झालेली आहे. तर काही भागांमध्ये पाणी शिरल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान, तालुक्यातील ओढरे येथील जलप्रकल्प हा जीर्ण झाला असून तो पूर्णपणे भरलेला आहे. हा प्रकल्प सध्या ओसंडून वाहू लागला असून तो फुटण्याची भिती तेथील काही ग्रामस्थांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे. हा बंधारा फुटल्यास येथे मोठी हानी होण्याची शक्यता असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.