पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान काल सायंकाळी (५ मे) अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका अनोळखी पुरुष, एक महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या अंदाजे अडीच वर्षांच्या मुलाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली आहे. या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी पुरुषाची ओळख पटली असून, महिला आणि बालकाची ओळख पटवण्याचे काम पाचोरा पोलीस करत आहेत.
या घटनेची माहिती अयोध्या सुपरफास्ट एक्सप्रेसचे लोकोपायलट डी. एफ. डिसुझा यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली. त्यांनी सांगितले की, पाचोरा ते परधाडे दरम्यान रेल्वे किलोमीटर खांब क्रमांक ३७६/१९ जवळ एक महिला, पुरुष आणि लहान मुलगा रेल्वे पटरीवरून चालत येत असताना त्यांच्या गाडीसमोर आले आणि ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळ गाठले.
घटनास्थळावर पोहोचल्यावर पोलिसांनी पाहणी केली असता, अनोळखी पुरुष, महिला आणि अंदाजे अडीच ते तीन वर्षांच्या मुलाचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पडलेले आढळले. रुग्णवाहिका चालक किशोर लोहार आणि पोलिसांच्या मदतीने तिन्ही मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज (६ मे) मृतांपैकी पुरुषाची ओळख पटली असून त्याचे नाव राजेंद्र निंबा मोरे (वय २२ वर्षे, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा) असे आहे. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी महिला आणि बालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत. या तिघांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचीही कसून चौकशी पोलीस करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.