नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या मालकीवरून उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी शिवसेनेवर हक्क सांगितला असून या संदर्भात एकमेकांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. कोर्टाने यावर एकत्रीत सुनावणी घेण्याचे निश्चीत केले असून या अनुषंगाने सुनावणी होत आहे. यावर आधी ४ ऑगस्टला सुनावणी झाली. यानंतर ७ रोजी यावर कामकाज होऊन नंतर १२ ऑगस्ट रोजी याला पुढे ढकलून २२ ऑगस्ट तारीख देण्यात आली. या अनुषंगाने आज दिनांक २२ रोजी याची सुनावणी होणार असल्याचे मानले जात होते. तथापि, आजची सुनावणी ही पुन्हा एकदा पुढे गेली असून यावर उद्या म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. कारण सुनावणी होणार्या यादीत समाविष्ट असणार्या प्रकरणात बदल झाला असल्याचे दिसून आल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठापैकी न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार सोमवारी अनुपस्थित असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची अपेक्षा शिवसेनेला आहे. तथापि, रामण्णा पदावर असतांनाच याचा निकाल लागणारी की त्यांच्या जागी येणारे न्या. लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली यावर निकाल लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.