नवीदिल्ली, वृत्तसंस्था | निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकार केली आहे आणि त्या याचिकेवर १७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायाधीशांनी दिली. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. निर्भयाच्या आईने न्यायालयाकडे आरोपींविरोधात डेथ वॉरंट काढण्याची मागणी केली होती.
सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी निर्भयाच्या वकीलांनी न्यायालयाकडे आरोपींच्या फाशीची तारीख निश्चित करण्याची मागणी केली. यापूर्वी निर्भयाच्या आईनेदेखील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “मी न्यायलयाला हेच सांगणार आहे की, यांनी खूप मजामस्ती करुन घेतली आहे. आता लवकरात लवकर यांचा डेथ वॉरंट काढा आणि फाशीची शिक्षा जाहीर करा”. पुढे बोलताना त्यांनी व्यवस्थेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले. “जर आपली व्यवस्था दुबळी नसती तर आरोपीचे वकील व्यवस्थेला आव्हान देऊ शकले नसते. त्यांनी आमची अशी खिल्ली नसती उडवली. जेव्हा आरोपी गुन्हा करतात तेव्हा आपला देश आंबेडकर आणि गांधींचा देश नसतो का ? गुन्हा झाल्यावरच सगळ्यांना ते का आठवतात,” अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
“जेव्हा एखाद्या लहान मुलीवर बलात्कार होतो तेव्हा सगळंच संपून जातं. पण जेव्हा शिक्षेची वेळ येते तेव्हा मानवाधिकारच्या घोषणा देत अनेक संस्था उभ्या राहतात,” अशी खंत निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे. “मी न्यायालयाला सांगणार आहे की, आमच्या भावना आणि अश्रूंकडे पाहून निर्णय़ देऊ नका. पण आमच्या मुलींसोबत काय होतंय हे पहा. सात वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही. आजही मुलांना जाळून मारले जात असून प्रशासन डोळे बंद करुन बसलं आहे,” असा संताप निर्भयाच्या आईने व्यक्त केला आहे. “सात वर्ष झाली मात्र आरोपींना अद्यापही शिक्षा झालेली नाही. यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे. कोणताही गुन्हा करा शिक्षा मिळणार नाही असा संदेश समाजात जात आहे,” अशी भीती निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.