मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात स्वच्छतेच्या बाबतीत सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संताजी नगर कमानजवळ भुसावळ रोडवरील तहसील कॉर्नरलगत भर रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचलेला असून, या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. नगरपंचायतीच्या कामकाजावर नागरिकांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत नगरपंचायतीची घंटागाडी या परिसरात फिरकलीसुद्धा नाही. परिणामी, रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिक व प्रवासी यांना नाकावर रुमाल धरावा लागत आहे. स्थानिकांनी स्पष्टपणे सांगितले की, “दररोज येथे कचरा टाकला जातो, मात्र प्रशासन डोळेझाक करत आहे.” नागरिकांच्या मते, कचऱ्याचा ढीग नेहमीच याच ठिकाणी दिसतो, पण त्याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाखो रुपये खर्च करूनही मुक्ताईनगरात प्रत्यक्षात स्वच्छतेची परिस्थिती सुधारलेली नाही. या बाबत सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कचरा उचलण्याचे काम वेळेवर केले जात नाही.
संतप्त नागरिकांनी मागणी केली आहे की, तातडीने हा कचरा हटवून परिसराची साफसफाई करण्यात यावी. तसेच, नियमित घंटागाडीची सेवा सुरु ठेवावी व संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
या प्रकरणातून स्पष्ट होते की, नगरपंचायत प्रशासनाचे नियोजन कोलमडले असून, नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर स्वच्छता मोहीम राबवून शहराचे आरोग्य सुधारण्याची गरज आहे.



