जळगाव (प्रतिनिधी)। निर्धार योग प्रबोधिनीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस महिलांसाठी खास ‘आपल्या केसांचे आरोग्य आपल्या हाती’ हा विषय घेऊन सेमिनार संपन्न झाले. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध केशायुर्वेदाचार्य तथा जळगावमधील प्रथम केशतज्ज्ञ वैद्य भूषण देव तर प्रमुख अतिथी म्हणून रांगोळी तज्ज्ञ कुमुदिनी नारखेडे उपस्थित होत्या. निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून अल्पावधीतच जळगाव शहरात उपचारात्मक योग आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेकरिता देण्यात येणारी योगसाधना लोकप्रिय ठरली आहे. तर सामाजिक कामांचा अंतर्भाव करीत महिलांच्या आरोग्याकरिता प्रबोधिनी झटत आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केसांच्या आरोग्यासाठी महिलांचे लक्ष केंद्रची व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. यात अधिक उपचार देण्यासाठी डॉ.भूषण देव यांनी शिबिराची घोषणा केली आहे. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या कुमुदिनी नारखेडे यांनी महिलांशी संवाद साधत रांगोळ्यांच्या माध्यमातून नकळत काही आसने आपण करीत असतो याची प्रचिती दिली. तर आपल्या ज्ञानातील काही शिंपले काढत महिलांना निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदातील मात्र आपल्याला सहज उपलब्ध होतील अशा काही वनस्पतींची माहिती दिली.
(चौकट) निर्धार योग प्रबोधिनीचा आवाका दिवसेंदिवस वाढत असून नुकतीच महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विद्यापीठ अर्थात कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर यांचे अधिकृत सेंटर निर्धारला प्राप्त झाला आहे. ज्यातून ‘योगशिक्षकाचा’ सहा महिन्याचा डिप्लोमा आणि ‘योगशास्त्र आणि निसर्गोपचार डिप्लोमा’ हा एक वर्षाचा कालावधी असलेला डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रवेश प्रकीर्या सुरु झाली असून दि.१ एप्रिल पासून प्रत्यक्ष कोर्सेस सुरु होणार आहेत.
केसांच्या आरोग्यासाठी आयोजित कार्यक्रमात योगसाधकांसह परिसरातील ४५ महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम प्रसंगी निर्धारच सचिव कृणाल महाजन यांनी प्रस्तावना केली तर सुजल भोसले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्षा स्मिता पिले यांनी आभार व्यक्त करत आयुर्वेदिक काढ्याने कार्यक्रमाची सांगता झाली.