भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून आज (३०जून) सकाळी ११.०० वाजता फेकरी प्राथमिक उपकेंद्रासमोर अपघात झाला असता तेथील आरोग्य उप केंद्र बंद असल्याने अपघात ग्रस्तांवर उपचार होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राच्या गेटला पुष्पहार घालून प्रशासनाचा निषेध केला.
त्यावेळी युवासेना तालुका प्रमुख हेमंत बऱ्हाटे, उपतालुका प्रमुख पवन बाक्से, मयूर जाधव यांना परिसरातील नागरिकांनी आरोग्य केंद्रा महिन्यात केवळ एक दिवसच सुरू असते, अशी माहिती दिली. युवसैनिकांनी आरोग्य केंद्राची दुरवस्था पाहून सदर केंद्राची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी युवासेना कार्यकर्ते पियुष बऱ्हाटे, वैभव बोरोले, राहुल सोनवणे, अनिकेत टोके, मृगेन कुळकर्णी उपस्थित होते.
परिसरातील साकरी, फेकरी केंद्राची दुरावस्था झालेली असून केंद्राच्या गेटवर नागरिक कपडेही वाळत घालतात. गुरे-ढोरे, शेळ्या-मेंढ्या केंद्रात आराम करण्यासाठी येतात.
या परिस्थितीत पावसामुळे आजार पसरण्याची भीती असून मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून न दिल्यास युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता सोमवारपासून भुसावळ परिसरातील सर्व आरोग्य केंद्रांची पाहणी करण्यात येणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.