Home आरोग्य ‘स्वस्थ माता, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन

‘स्वस्थ माता, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन

0
135

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व गोदावरी फाउंडेशनच्या वतीने १७ सप्टेंबरपासून ‘स्वस्थ माता, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आरोग्य सेवेशी जोडलेली ही लोकाभिमुख चळवळ प्रभावीपणे पुढे सरकली.

जळगाव तालुक्यातील कडगाव, भुसावळ, नशिराबाद आणि जळगाव विमानतळ येथे एकाच दिवशी घेण्यात आलेल्या शिबिरांमध्ये एकूण ४४२ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर १७६ स्वयंस्फूर्त रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श उभारला. शिबिरांचे मार्गदर्शन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके व वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी केले.

प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांच्या विशेष टीमने सेवा बजावली. कडगावमध्ये डॉ. अनुजा, भुसावळात डॉ. पल्लवी, नशिराबादेत डॉ. सई, डॉ. दिव्या, डॉ. एश्वर्या, डॉ. प्रसाद, डॉ. पंकज, डॉ. अभिजित, डॉ. आवेश तर जळगाव विमानतळावर डॉ. हृषीकेश, डॉ. सुशांत, डॉ. सायली, डॉ. मंजिरी, डॉ. प्रज्वल आदींनी तपासणीत भाग घेतला. या शिबिरांच्या आयोजनासाठी रविंद्र तनवर, अमोल चौधरी, राज सोनवणे, रितेश वारके, यश वाघ आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमांतर्गत भुसावळ, कढोली व खडका येथे १८ सप्टेंबर रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका आणि भाजपा जळगाव जिल्हा पूर्वच्या सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी या उपक्रमात स्वतः सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी भुसावळ येथे तेरापंथ व जैन मंदिरात आयोजित शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा सन्मान केला. या उपक्रमाचे आयोजन ‘सेवा पंधरवडा’च्या पहिल्या दिवशी करण्यात आले होते.


Protected Content

Play sound