जळगाव (प्रतिनिधी) उद्या (दि.२१) आंतरराष्टीय योग दिनानिम्मित, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विश्वमंगल योग व निसर्गोपचार केंद्र आणि योग विद्या गुरुकुल यांच्यातर्फे ‘हॅप्पी स्ट्रीट योगा’चे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १६ रोजी सकाळी ६.०० ते ७.०० स्वातंत्र्य चौक, ७.०० ते ८.०० महेश चौक, ८.३० ते ९.३० ख्वाजामिया चौक, संध्याकाळी ६.०० ते ७.००, काव्य रत्नावली चौक, १७ जून रोजी गांधी उद्यान, १८ जून बहिणाबाई उद्यान, १९ जून खान्देश मिल, २० जून जळगाव क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत विविध वयोगटातील विद्यार्थी, महिला, पुरुषांनी योग व प्राणायामाची प्रात्यक्षिके केली. या प्रसंगी विश्वमंगल योगच्या संचालिका सौ. चित्रा महाजन, डॉ. भावना चौधरी, सौ. रुपाली ठाकूर, सौ. सीमा पाटील, सौ. कविता चौधरी, सपना उपाध्याय, जयश्री चौधरी, दिपीका चांदोरकर, नेहा तळले यांनी नागरिकांकडून योगाच्या काही आसनांचा सराव करून घेतला. खेमचंद्र पाटील व निलांंबरी जावळे यांनी योग गीत म्हटले. विद्यार्थी व महिलांनी योग प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील यांनीही मार्गदर्शन केले . महापौर सीमा भोळे यांनी उपस्थित राहून सर्वाना योगाचे महत्व सांगितले व सर्वांना योग करण्याचे आवाहन केले. २१ जूनला विविध शाळा, कंपन्या, शासकीय व निमशासकीय कार्यालये येथे ‘योग दिना’चे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा, सर्व योग शिक्षक व साधक यांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.