हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा दिला राजीनामा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून पालकमंत्रिपदांच्या वाटपावरून नाराजीचा सूर उमटत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे गेले असून, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हे पदभार देण्यात आले आहे. यामुळे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर दोघेही नाराज असल्याचे बोलले जात आहे. मुश्रीफ यांना कोल्हापूरऐवजी वाशिमची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांनी आता ही जबाबदारी सोडली आहे.

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणे कठीण असल्याचे कारण दिले आहे. “कोल्हापूर, मुंबई आणि वाशिम असा सातत्याने 800 किमीचा प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे मी वाशिमच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे,” असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी वाशिमला पोहोचलेले मुश्रीफ कार्यक्रमानंतर कोणतीही बैठक न घेता थेट कोल्हापूरला परतले होते. यावरून त्यांच्या नाराजीनाच अधिक बळ मिळाले होते.

मुश्रीफ यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यास लवकरच नवीन पालकमंत्री मिळणार आहे. सध्या क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे या पदाचा तात्पुरता कार्यभार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदांच्या वाटपावरून सुरू असलेली नाराजी पाहता, पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content