अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मारवड गावातील हर्षिता सुनील साळुंखे हिने विभागीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक स्पेअर प्रकारात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. सातत्यपूर्ण मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यांच्या बळावर तिने विभागात आपली योगकला ठसवली असून आता ती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
मारवड येथील रहिवासी आणि महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेल्या सुनील साळुंखे यांची कन्या हर्षिता ही काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे शिक्षण घेत आहे. १९ वर्षांखालील गटातील आर्टिस्टिक स्पेअर या प्रकारात जिल्हास्तरावर उत्तुंग यश मिळवल्यानंतर तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे झालेल्या विभागीय योगासन स्पर्धेत हर्षिता आणि सहकारी विद्यार्थिनी सिमरन बारी यांनी प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.

या संपूर्ण प्रवासात हर्षिता आणि सिमरनला डॉ. अनिता पाटील मॅडम यांचे निकोप आणि प्रोत्साहनपर मार्गदर्शन लाभले. कठोर सराव, संतुलन, लवचिकता आणि कलात्मकतेचा सुरेख संगम साधत या दोघींनी विभागीय स्तरावर उत्तुंग कामगिरी नोंदवली. आता त्यांच्या पुढे राज्यस्तरीय आर्टिस्टिक स्पेअर स्पर्धेचे मोठे व्यासपीठ खुले झाले आहे.
हर्षिताच्या या यशाने संपूर्ण मारवड परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक, क्रीडा प्रेमी आणि पालकांनी तिच्या जिद्दीचे कौतुक करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. सतत झपाट्याने प्रगती करत असलेली हर्षिता भविष्यात योग क्षेत्रात आणखी मोठी भरारी घेईल, अशी अपेक्षादेखील व्यक्त केली जात आहे.



