
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावात गेल्या ४४ वर्षांपासून अखंड सुरू असलेला हरिनाम कीर्तन सप्ताह यंदाही पारंपरिक भक्तिभावाने आणि नव्या उमेदीने साजरा होणार आहे. ११ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या या आध्यात्मिक सप्ताहात दररोज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गावकरी वर्ग, श्रीराम मंदिर संस्थान, संत मुक्ताई महिला भजनी मंडळ आणि बालगोपाळ भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा भव्य स्वरूपात पार पडणार आहे.

या सप्ताहाची सुरुवात दिनांक ११ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरतीने होणार असून, त्यानंतर दररोज सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८:३० ते १० या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. योगी दत्तानंद महाराज (पिलखेडा आश्रम) यांच्या पवित्र वाणीतून कीर्तन होणार आहे. दररोज विविध ठिकाणाहून येणारे नामवंत कीर्तनकार आपले कीर्तन सादर करणार असून, भक्तांना अध्यात्मिक आनंदाचा अनुभव देणार आहेत.
१२ ऑक्टोबरला ह.भ.प. सोपान गोळे सर (सिन्नर), १३ रोजी ह.भ.प. सोपान महाराज (मराठखेडा), १४ रोजी ह.भ.प. जनार्दन महाराज (मराठखेडा), १५ ऑक्टोबरला ह.भ.प. साहिल महाराज (तळेगाव), १६ ला ह.भ.प. किशोर महाराज (काळे अकोला) आणि १७ ऑक्टोबरला दुपारी ४ ते ७ दरम्यान पालखी सोहळा गावात भव्य मिरवणुकीद्वारे काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत गीता, भागवत व ज्ञानेश्वरीसह विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुका घेऊन घरोघरी पूजन व आरती होईल. याच दिवशी रात्री ह.भ.प. माधव महाराज (ढाकणे, आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे.
१८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. पंकज महाराज पवार (अमरावती) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून तरुण पिढीने या कीर्तन सप्ताहाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून, त्यांनी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रम राबवून हा कार्यक्रम अधिक प्रभावी व भक्तिमय बनवला आहे. या सप्ताहात विनेकरी ह.भ.प. निवृत्ती महाराज कळमसरे, मृदुंगाचार्य बजरंग महाराज, प्रवीण महाराज, चोपदार ह.भ.प. भुलेश्वर चौधरी आणि जितेंद्र महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होऊन परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन होण्याची आणि आत्मिक शांतीचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी सर्व ग्रामस्थ व भाविक भक्तांना मिळणार आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना कीर्तन सप्ताहात उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.



