महारोगी सेवा समितीचे सेवाव्रती हरीकाका बढे कालवश

जळगाव प्रतिनिधी । वरोरा येथील महारोग सेवा समितीचे विश्‍वस्त तथा सोमनाथ प्रकल्पाचे प्रमुख हरीकाका बढे यांचे उपचार सुरू असतांना देहावसान झाले. ते मूळचे हिंगोणा (ता. यावल) येथील रहिवासी होते.

महारोगी सेवा समिती, वरोरा यांचे विश्‍वस्त आणि सोमनाथ (ता. मुल, जिल्हा चंद्रपूर) प्रकल्पाचे प्रमुख हरी बढे यांना दि. २३ रोजी देवाज्ञा झाली. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी सामना करताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍च्यात त्यांच्या पत्नी आणि दोन विवाहित मुली असा त्यांचा परिवार आहे.

हीकाका बढे हे मूळचे यावल तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी होते. त्यांना कुष्ठरोगाचा संसर्ग झाल्यामुळे ते बाबा आमटे यांच्या सानिध्यात आले. त्यांचा प्रवास सुरु झाला ते अमरावतीच्या तपोवन पासून. तिथून ते आनंदवन मध्ये आले. बाबा आणि साधना ताईंच्या सानिध्यात काम करू लागले. स्वतः कुष्ठरुग्ण असून त्यांनी आनंदवनच्या आनंद निकेतन महाविद्यालयात पदवी प्राप्त केली. पुढे त्यांची शेतीत असलेली रुची हेरून बाबांनी त्यांची सोमनाथ प्रकल्पावर नेमणूक केली. तिथे ते शंकरदादा सोबत खांद्याला खांदा लावून सर्व कामे करत असत. कृषी विद्यापीठ म्हणून सोमनाथ ची ओळख व्हावी या बाबांच्या स्वप्नाला सत्यात उतविण्याचे काम हरी भाऊंनी केले. गेली अनेक दशके ही धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळत होते.

सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीच्या नियोजनाचा तर ते एक अविभाज्य भाग होते. यावर्षी कुठे श्रमदान केले तर त्याचा काय फायदा होईल, आता नेमकी कशाची गरज आहे हे समजून त्यानुसार त्याचे नियोजन करण्याचे कौशल्य त्यांना चांगलेच अवगत होते. शिवाय पदवीधर असलेले सोमनाथचे ते पहिले कार्यकर्ते आहेत. म्हणून इतर कार्यकारिणीचा भारही त्यांच्यावरच होता. सोमनाथला येणार्‍या जाणार्‍या लोकांची नित्यनियमाने चौकशी आणि त्यांच्याशी संवाद हे त्यांचे कधीही चुकले नाही.

हरीकाका बढे यांनी आनंदवनातच पु.ल. देशपांडे यांच्या उपस्थितीत विवाह केला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन सुविद्य मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे हे असे जाणे महारोग सेवा समितीसाठी मोठा धक्का असल्याची संवेदना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून एक श्रम महर्षी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

Protected Content