धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील संताजी नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी चोपडा येथे 10 लाखांची मागणी करत मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी करत छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील संताजी नगर येथील माहेर असलेल्या गरिमा स्वप्निल चौधरी यांचा विवाह चोपडा शहरातील स्वप्निल साहेबराव चौधरी यांच्याशी रीतीरीवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेराहून घर घेण्यासाठी 10 लाखांची मागणी करण्यात आली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही, या रागातून पतीकडून तिला मारहाण करण्यात आली. तसेच सासू, सासरे आणि दिर यांनी देखील पैशांसाठी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान याप्रकरणी त्यांनी धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी 10 जुलै रोजी दुपारी 2 वाजता पती स्वप्नील साहेबराव चौधरी, सासरे साहेबराव महादेव चौधरी, सासु शोभा साहेबराव चौधरी आणि दिर गौरव साहेबराव चौधरी सर्व रा. चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.