जळगाव प्रतिनिधी । मित्रांचा वाद मिटविण्यासाठी मध्ये पडलेल्या राहूल सुरेश बोरसे आणि सुमित बोरसे या दोघा भावांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 17 रोजी रात्री गांधीनगरात घडली होती. दोघे भाऊ जखमी झाले होते. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीतील मोठा भाऊ सुमित बोरसे यांचा आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमीचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यातील कलमांमध्ये खूनाचा कलम वाढविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भूषण कॉलनीतील राहूल बोरसे याचा कॉलनीतीलच मित्र गणेश एकनाथ भोळे याचा 17 रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने राहूलसह त्याचा मोठा भाऊ सुमित व मित्र जमले होते. शतायू नावाच्या मित्राला रात्री 10.45 वाजता देवेन मनोहर चौधरी याचा फोन आला. डॉ. नवाल यांच्या गल्लीत दर्शन जैन यांच्या बरोबर भांडण झाल्याचे सांगितले. त्यानुसार राहूलसह सर्वजण देवेनकडे गेले.
डॉ. नवाल गल्लीत पोहचल्यावर याठिकाणी दर्शनचा शोध घेतला. तो व त्याच्यासोबत पाच जण गिलोरी नावाचा खेळ खेळत होते. त्याच्या घरासमोर जावून देवेन केलेल्या भांडणाचा जाब विचारला असता दर्शन तसेच त्याच्यासोबत पाच जणांनी राहूल याच्या पाठीमागे उजव्या बाजूने तर त्याचा मोठा भाऊ सुमित याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला. व दोघेही पसार झाले. मित्रांनी दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दोघांवर उपचार सुरु होते. यातील गंभीर जखमी असलेला सुमितचा आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात राहूल बोरसे याच्या फिर्यादीवरुन दर्शन जैन याच्यासह 7 जणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातही आरोपींना शहर पोलीसांनी अटक केले असून आता जखमीचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यातील कलमांमध्ये खूनाचा कलम वाढविण्यात आला आहे.