Home क्रीडा ११ चेंडूत अर्धशतक ; मेघालयच्या आकाश चौधरीने रचला विश्वविक्रम!  

११ चेंडूत अर्धशतक ; मेघालयच्या आकाश चौधरीने रचला विश्वविक्रम!  


सूरत – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात असा स्फोटक खेळ झाला की क्रिकेटप्रेमी थक्क झाले! मेघालयचा युवा ऑलराउंडर आकाश कुमार चौधरी याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध तब्बल ११ चेंडूत अर्धशतक झळकावत विश्वविक्रमाची नोंद केली. आकाशने केवळ विक्रमच मोडला नाही, तर त्याने सलग आठ चेंडूंवर आठ षटकार ठोकून युवराज सिंगची ऐतिहासिक झलकही आठवली.

सुरतमध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात मेघालयच्या डावात आकाश चौधरीने अवघ्या १४ चेंडूत नाबाद ५० धावा ठोकल्या. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे मेघालयने पहिला डाव ६२८ धावांवर घोषित केला. आकाशच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे केवळ मेघालयच्या धावा वाढल्या नाहीत, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रमही इतिहासजमा झाला.

याआधी हा विक्रम इंग्लंडच्या वेन व्हाईट यांच्या नावावर होता. व्हाईट यांनी २०१२ साली एसेक्स संघाविरुद्ध १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. परंतु आकाशने त्यापेक्षा एक चेंडू आधी, म्हणजेच ११ व्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण करून हा विक्रम आपल्या नावावर केला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात हा विक्रम अद्याप कोणालाही साधता आला नव्हता. याआधी जम्मू-काश्मीरच्या बंदीप सिंगने २०१५-१६ च्या हंगामात १५ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

आकाशने या खेळीत एका ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकत रवी शास्त्रींनंतर रणजी इतिहासात हा कारनामा करणारा फक्त दुसरा फलंदाज ठरला. एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स झळकावण्याची कामगिरी यापूर्वी १९८५ मध्ये मुंबईच्या रवी शास्त्रींनी केली होती.

आकाश चौधरी अलीकडे सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मागील सामन्यात बिहारविरुद्ध त्याने ६२ चेंडूत ६० धावांची खेळी साकारली होती, ज्यात पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. या सलग कामगिरीमुळे आकाश रणजी सर्किटमध्ये उदयोन्मुख स्टार म्हणून ओळख मिळवत आहे.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आकाशने आतापर्यंत ३१ सामने खेळले असून ५४० धावा आणि ८५ विकेट्स अशी प्रभावी आकडेवारी त्याच्या नावावर आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात त्याने सातत्याने संघासाठी योगदान दिले आहे.


Protected Content

Play sound