Home Cities जळगाव एरंडोल, धरणगावात गारपिटीचा फटका; पिके उद्ध्वस्त, घरांचे पत्रे उडाले !

एरंडोल, धरणगावात गारपिटीचा फटका; पिके उद्ध्वस्त, घरांचे पत्रे उडाले !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील एरंडोल आणि धरणगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून, घरांचे, शेडचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.

एरंडोल तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे आणि वीज कोसळल्यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या. मौजे एरंडोल शिवारात पद्मालय रस्त्यावर वीज पडल्याने चार बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर, जळू गावात धनसिंग अभिमन शिंदे यांच्या मालकीचा बैल वीज पडून मरण पावला. खडके खुर्द येथे भिंत कोसळून वेडू धनसिंग पाटील यांच्या पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. गणेशनगर येथे विष्णू धना जोगी यांच्या झोपडीवर झाड पडल्याने झोपडी आणि घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

याशिवाय, नशिराबाद आणि निमगाव बुद्रुक येथे गारपीट झाली असून, काही पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच घरांवरील पत्रे उडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वाकडी गावातही गारपिटीमुळे घरांच्या छताचे पत्रे उडाले असून, पिकांचे अंशतः नुकसान झाले आहे.

धरणगाव तालुक्यातही वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. एकलग्न बुद्रुक येथे ढोलू विश्वनाथ पाटील यांची म्हैस झाडाखाली बांधलेली असताना वीज पडून जागीच ठार झाली. धारागीर येथे सुरेश गोपीचंद पाटील यांच्या म्हैशीचा वीज पडून मृत्यू झाला. पुनगाव येथे युवराज एकनाथ बाविस्कर यांच्या म्हैशीवर झाड कोसळल्याने तिचा जीव गेला. धानोरा मंडलातील धानोरा आणि देवगाव येथे प्रचंड वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत, तर लोणी आणि पंचक या गावांमध्ये पपईच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य मदत पुरवावी, अशी मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound