मुडी ग्रामपंचायत येथील जिम साहित्य धूळखात

अमळनेर प्रतिनिधी । एकीकडे ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा साहित्य जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, ही सुविधा मुडी प्र डांगरी ग्रामपंचायतींना देण्यात आली नसून जिमची उपकरणे धूळखात पडली आहेत.

शासनाची रक्कम वाया गेली असल्याची चिन्हे आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी चांगल्या उद्देशाने पाठवलेले साहित्य धूळखात पडले आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंगणवाडीत चक्क खाजगी आर ओ प्लांट च्या जवळ हे साहित्य धूळखात असल्याची ओरड स्थानिक तरुणाईने केली आहे. ना व्यायामशाळा ना जीमसाठी सुविधा एकीकडे वायफळ खर्च करणारी ग्रामपंचायत मात्र ज्या तरुणाईच्या जीवावर निवडून आली त्यांनाच उपेक्षित ठेवले आहे. एकीकडे अंगणवाडी दुरूपयोग तर दुसरीकडे जिम साहित्याचा दुरुपयोग होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे साहित्य शो साठी पडले आहे. याकडे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायत विरोधात चौकशी करावी अशी मागणी तरुणाईने केली आहे.

आर ओ प्लांट धूळखात – निवडणुकीच्या तोंडावर बसवलेला खाजगी आर ओ प्लांट तात्पुरती मलमपट्टी झाली आहे. हा प्लांट बंद पडल्याने तेथील साहित्य देखील हटवले नसून हा आर ओ प्लांट कुणाचा याबाबत चौकशी व्हावी. एकीकडे ग्रामपंचायत मार्फत 13 व्या वित्त आयोगातून गावोगावी शुद्ध पाण्याचे प्रकल्प उभे ठाकले मात्र मुडी प्र डांगरी या पुढारलेल्या गावाचे दुर्दैव असे की या गावाला शुद्ध पेयजल देखील ग्रामपंचायतीला उपलब्ध करता आले नाही. केवळ टक्केवारी च्या नादात मलई खाऊ धोरण आखलेल्यांना निवडून आणून काय दिवे लावले आहेत ते सदस्यांनी सांगावे अशी मागणी तरुणाई करत आहे.

 

Protected Content