अमळनेर (ईश्वर महाजन ) – उगवतीच्या खडतर प्रवासाचे आव्हान संयमित मनाने व कणखर मनगटाच्या आधारे पेलून जीवनवाट फुलवणं साऱ्यांनाच साधत नाही. जे हे दिव्य पेलतात, तेच समाजातील दीपस्तंभ ठरतात. तालुक्यातील सतत अवर्षण प्रवण खेड्यातील संदीप पाटील आणि हर्षा पाटील हे आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर तालुक्याचे आदर्श व्यक्तिमत्व ठरले आहेत. दोघांनी प्रतिकूल परिस्थितीशी सकारात्मकतेने झुंजत राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादून इच्छा असेल तर सफलता चरण स्पर्श करते, हे सिद्ध केले आहे.
संदीप पाटील हा मूळ सात्रीचा, परिस्थिती हलाखीची.. वडील सालदार.. आयुष्य कष्टातच.. इतर स्पर्धा परीक्षेच्या पाच ते सात परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्य कर सहाय्यक पदाची नोकरी स्वीकारून नोकरीच्या ठिकाणी रुजू होतो. जणू नोकरी संदीपचा पाठलाग करीत होती. आपल्या कष्टकरी आई-वडिलांना स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन परिस्थिती बदलणारा भगीरथ मिळणे हे भाग्याचं लक्षण आहे.
अशाच जेमतेम परिस्थितीत हर्षा पाटील या तरुणीचे जीवन कष्टप्रद गेले तिच्या वडिलांनी विनाअनुदानित शाळेत नोकरी करून मुलीला वाढविले व संस्कारांची शिदोरी दिली. स्वतः शेतात राबून परिस्थितीशी दोन हात केले. हर्षाने सकाळी कॉलेज अन दुपारी शेतात जाऊन आई वडिलांना मदत करून कर सहाय्यक पद मिळवले. अगदी खडतर परिस्थितीतून पुढे आलेले हे दोघेजण आता आपल्या जीवनरुपी नौकेचे शिलेदार बनले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही ज्ञानयज्ञाच्या वाटसरुंसाठी जळगाव येथे एक टेबल आणि दोन खुर्च्या असा नोकरी करण्याचा योग परमेश्वरानेच जणू शोधून ठेवला होता.
अमळनेर येथील त्यांचे सहयोगी मार्गदर्शक प्रताप कॉलेजचे उपप्राचार्य एस.ओ. माळी व विजयसिंह पवार यांच्या दोघांच्या नात्यातील ज्येष्ठांच्या पुढाकाराने ते सात जन्माच्या वैवाहिक बंधनात बांधले गेले आहेत. हे दोन्ही ज्ञानगंगेचे वाटसरू आपल्या सहजीवनाची सुरुवात करताना अत्यानंदित आहेत. खरंच दोन्ही ज्ञानयोगी, कर्मयोगी, एकमेकांच्या विवाह बंधनात अडकले असून भविष्यात तालुक्यातील तळागाळातील मुलांना त्याचे जीवन मार्गदर्शक ठरेल हे निश्चित !