दोन दुकानातील गुटख्याचा साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलन पेठेतील तिजोरी गल्लीत आरोग्यास हानीकारक असलेला पानमसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी असा २ लाख ३ हजार ४१० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन दुकाने सील करण्यात आले. ही कारवाई सोमवार, १० जून रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली. या प्रकरणी दोघं दुकानदारांविरुद्ध रात्री १० वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पोलन पेठ येथील तिजोरी गल्लीमध्ये प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार पथक मीरा ट्रेडर्स या दुकानावर पोहचले. तेथे दुकानात पानमसाला, तंबाखू, सुपारी यांचे पाकीट आढळून आले. त्यांची किंमत १ लाख ४ हजार ५३५ असून याचे नमुने घेऊन साठा जप्त करण्यात आला. या सोबतच याच परिसरातील आशीर्वाद ट्रेडर्स या दुकानावरदेखील पथकाने कारवाई केली. या दुकानातूनही पानमसाला, तंबाखू, सुपारी यांचे आढळून आले. त्याची किंमत ९८ हजार ८७५ रुपये आहे. या साठ्याचेही नमुने घेऊन तो जप्त करण्यात आला. ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत. एकुण २ लाख ३ हजार ४१० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मीरा ट्रेडर्सचे मालक संतोष हुकुमतमल राजपाल रा. सिंधी कॉलनी) व आशीर्वाद ट्रेडर्सचे मालक रवी चंद्रभान चिमनानी (रा. गणपतीनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.

Protected Content