Home Cities जळगाव जळगावच्या रंगभूमीचा आधारस्तंभ चिंतामण पाटील यांना गुरुसन्मान ;  १६ रोजी गौरव सोहळा

जळगावच्या रंगभूमीचा आधारस्तंभ चिंतामण पाटील यांना गुरुसन्मान ;  १६ रोजी गौरव सोहळा

0
281

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या हौशी रंगभूमीवर पाच दशके सातत्याने कार्यरत राहून नाट्यकलेच्या माध्यमातून असंख्य कलाकार घडवणारे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांचा “गुरुसन्मान” म्हणून महोत्सवी कार्यगौरव सोहळा १६ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. खान्देश नाट्य प्रतिष्ठानच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने आजी-माजी कलावंतांच्या वतीने हा सोहळा रोटरी भवन, मायादेवी नगर येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला असून, प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे श्री. प्रविण भोळे हे उपस्थित राहणार आहेत.

चिंतामण पाटील हे केवळ दिग्दर्शकच नाही, तर ते एक कठोर पण काळजीवाहू मार्गदर्शक, नाट्यक्षेत्रातील संस्थापक, नट आणि तंत्रशिक्षक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी केवळ अभिनेत्यांचा घडवला नाही, तर अनेक दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशकार आणि अन्य तांत्रिक घटकांत पारंगत कलावंत जळगावच्या रंगभूमीला दिले आहेत. त्यांनी अभिनय, दिग्दर्शन, तंत्र आणि रंगमंचावरील शिस्त यांचा उत्तम समन्वय साधत एक नाट्यपरंपरा निर्माण केली आहे.

वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या चिंतामण पाटील यांची “खानाप्र जळगाव” ही संस्था ४८ वर्षांची वाटचाल पूर्ण करत सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. कोणत्याही संकुचित गटात अडकून न पडता, सर्व नाट्यप्रयोगांना मदत करणारे, नवे कलाकार घडवणारे आणि तितक्याच आपुलकीने त्यांच्या अडचणी समजून घेणारे रंगकर्मी म्हणून चिंतामण पाटील यांना ‘चिंतामण मास्तर’ म्हणून संपूर्ण नाट्यवर्तुळात सन्मानाने ओळखले जाते.

या गौरव सोहळ्याचे आयोजन खान्देश नाट्य प्रतिष्ठानच्या आजी आणि माजी कलावंतांनी केले असून, या कार्यक्रमात जेष्ठ रंगकर्मी राजेंद्र देशमुख, गणेश सोनार, योगेश शुक्ल, पियुष रावळ, अरुण सानप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा केवळ एका कलाकाराचा गौरव नसून, जळगावच्या रंगभूमीवरील समर्पित परंपरेचे प्रतीक आहे.

शरद भालेराव यांच्या वतीने शहरातील सर्व रंगकर्मी आणि नाट्यरसिकांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चिंतामण पाटील यांचा गुरुसन्मान म्हणजे जळगावच्या नाट्यसृष्टीने आपल्या वडीलधाऱ्याला दिलेला सच्चा मान आहे.


Protected Content

Play sound