पाटणा वृत्तसंस्था । माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कथीत मारहाण प्रकरणावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं असून हे निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात गुंडाराज असल्याचा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी कालच ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना हा गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं आणि माध्यमांनी दबाव बनवल्यानंतर ६ लोकांना अटक करणं आणि दहाच मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे.
सामना वृत्तपत्रातून कंगना रणौतवर केलेल्या टिपण्णीप्रकरणी पत्रकरांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “सामना हे शिवसेनेचं वृत्तपत्र असून यातून शिवसेनेचं म्हणणं मांडलं जातं. शिवसेनेला जर असं वाटत असेल की कंगना पाण्यात राहून मगरीशी वैर घेत आहे तर हा शिवसेनेचा अहंकार बोलत आहे. लोकांना अहंकार आव़डत नाही. जेव्हा सत्ता अहंकारी होते तेव्हा तिचं पतन होतं आणि राज्यात सध्या तेच दिसत आहे.”