Home Cities जळगाव गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल !

गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल !

0
104

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आपली मूळ विचारधारा सोडल्याचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना मार्गदर्शन करण्याची गरज नसल्याचं ठामपणे सांगितलं.

 

“उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात ‘माझ्या शिवसेनेच्या बांधवांनो व भगिनींनो’ अशी होते, पण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात ‘हिंदू माता भगिनींनो आणि मित्रांनो’ अशी असायची. ही सुरुवातच बदलली आहे, त्यामुळे उर्वरित गोष्टींना काही अर्थ उरत नाही,” असं पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय भाषणावर प्रतिक्रिया देताना देखील गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला. “ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी आता बाळासाहेबांचं भाषण दाखवून काय उपयोग? त्यांनीच आधी ते भाषण ऐकावं आणि विचार करावा की बाळासाहेबांनी पक्ष स्थापन करताना काय विचार मांडले होते,” असा सवाल करत त्यांनी ठाकरे गटावर टीकेचे बाण सोडले.

आदित्य ठाकरे यांच्यावरही पाटील यांनी टीका करताना म्हटलं, “शिवसेनाप्रमुख हे आमचं दैवत आहे, पण आदित्य ठाकरे फक्त प्रॉपर्टीचे वारसदार आहेत, विचारांचे नाहीत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत. त्यांनी बाळासाहेबांच्या काळात जितकं काम केलं नाही, त्याहून अधिक आम्ही केलं आहे. त्यांनी आजोबांचा फोटो लावून स्वतःचं नाव कमावण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांच्या विचारांना पुढे नेतो, हाच आमच्यातला खरा फरक आहे.”

दरम्यान, शालेय अभ्यासक्रमातील हिंदी सक्तीच्या मुद्यावर निर्माण झालेल्या वादावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणावर आशिष शेलार आणि शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरे यांनीही ही बाब समजून घ्यावी, त्यानंतर निर्णय घ्यावा,” असं म्हणत त्यांनी मनसेला सूचक सल्लाही दिला.


Protected Content

Play sound